Tuesday 13 February 2018

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील 

पाकिस्तान आणि भारताचे आपसातील संबंध अत्याधिक बिघडल्याने गेल्या वर्षी मे महिन्यात विदेश मंत्रालयाने नवीन धोरणाची घोषणा करत भारतात उपचार घेण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना तेव्हाच मेडिकल व्हिसा दिला जाईल जे पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांची शिफारस आणतील. पण आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तराने एकच सवाल विचारला जात आहे की भारत किंवा पाकिस्तान धोरणाचे पालन करत आहेत किंवा नाही. भारतीय उच्चायोग, इस्लामाबाद यांनी गलगली यांची मागणी फेटाळत विचित्र तर्क दिला की मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील.

15 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विदेश मंत्रालयास 2 प्रश्नांची माहिती विचारली होती. यात 10 मे 2017 ते 1 डिसेंबर 2017 या दरम्यान किती पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यात आला आणि यापैकी कितींना पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांची शिफारस होती. दुसऱ्या प्रश्नात पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मंजूर करताना धोरण बदलण्याची माहिती मागितली होती. विदेश मंत्रालयाने हस्तांतरित केलेल्या अनिल गलगली यांच्या अर्जावर उत्तर देताना गृह मंत्रालयाच्या विदेश खात्याने कळविले की 380 पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रश्नांवर भारत सरकारने धोरणात कोणताही बदल न केल्याची माहिती दिली. अझीझ यांच्या शिफारसीवर कितींना मेडिकल व्हिसा दिला गेला यावर मौन बाळगले गेल्यामुळे अनिल गलगली यांनी प्रथम अपील दाखल करताच त्यांचा अर्ज भारतीय उच्चायोग, इस्लामाबाद येथे हस्तांतरित केला गेला.

भारतीय उच्चायोग, इस्लामाबाद येथील द्वितीय राजकीय सचिव अविनाश कुमार सिंह यांनी अनिल गलगली यांची मागणी फेटाळत विचित्र तर्क दिला की मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील.मी फक्त शिफारस बाबत माहिती विचारली होती आणि यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील संबंध कसे बिघडतील? कारण धोरण सरकारने स्वतःच बनविले होते. असा सवाल विचारत अनिल गलगली यांनी आकडेवारी सरकारने स्वतःच सार्वजनिक करण्याचे आवाहन केले आहे.

भारत सरकार ने ज्या धोरणाची घोषणा केली त्याचे अनुपालन पाकिस्तानने नाकारले असून यामुळेच भारत सरकार माहिती देत नाही. पाकिस्तान आणि भारताचे संबंध कधीच एकोप्याचे नसून सदर माहितीमुळे बिघडतील ही बाब पटण्यासारखी नसल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment