Sunday 5 November 2017

मुख्य माहिती आयुक्त पदावर नियुक्तीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त पद हे गेल्या 5 महिन्यापासून रिक्त असून निवड प्रक्रियेची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. यामुळे या पदासाठी इच्छुकांची यादी तूर्तास देणे शक्य नसल्याचा दावा महाराष्ट्र शासनाने केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्य माहिती आयुक्त पदासाठी इच्छुकांची यादी मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव श्वे प्र खडे यांनी अनिल गलगली यांस कळविले रत्नाकर गायकवाड, राज्य मुख्य माहिती आयुक्त हे दिनांक 29 मे 2017 रोजी सदर पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त पदभार अजित कुमार जैन, माहिती आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे देण्यात आलेला आहे. अनिल गलगली यांनी या पदासाठी इच्छुकांची यादी आणि सदर नियुक्ती ज्या स्तरावर प्रलंबित आहे याबाबत माहिती मागितली असता त्यांस कळविण्यात आले की राज्य मुख्य माहिती आयुक्त पदावर नियुक्तीसाठीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपणांस असलेली अपेक्षित माहिती तूर्तास देणे शक्य होत नाही. सदर नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर तदनुषंगिक माहिती देणे शक्य होईल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की ताबडतोब मुख्य माहिती आयुक्त पद भरण्यात यावे जेणेकरुन माहिती आयोगाच्या कामकाजास चालना मिळेल आणि जनतेस होणारा त्रास व प्रतिक्षा थांबेल.

No comments:

Post a Comment