Monday 20 March 2017

8 वेळा मुदतवाढीनंतर तयार झालेल्या कल्याण पूर्व स्कायवॉकचा खर्च रु 12.74 कोटी

विलंब आणि खर्चाच्या दृष्टीकोणातून कल्याण पूर्व येथील स्कायवॉक नागरिकांना तब्बल 6 वर्षाची प्रतिक्षा करावी लागली आहे. 39 टक्के जादा दराने निविदा रक्कम असतानाही काम पूर्ण होता होता रु 12, 74,57,084/- खर्चास मान्यता दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे. 8 वेळा मुदतवाढीनंतर तयार झालेल्या कल्याण पूर्व स्कायवॉकचा खर्च रु 12.74 कोटी झाला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे कल्याण पूर्व स्कायवॉकच्या बाबतीत माहिती मागितली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उप अभियंता नेमाडे भालचंद्र यांनी कळविले की भौतिकदृष्टया 31 डिसेंबर 2016 रोजी काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएच्या अनुदान मिळाले असून कामाचे कार्यादेश उल्हासनगर येथील मेसर्स जयहिंद रोड बिल्डर्सला 6 नवंबर 2009 रोजी देण्यात आले होते. 31 ऑक्टोबर 2008 रोजी स्थायी समितीने 39 टक्के जादा दराने रु 10,75,86,000/- च्या खर्चास मान्यता दिली होती. त्यानंतर 29 सष्टेबर 2015 रोजी रु 1,98,71,084/- इतक्या रक्कमेस मान्यता दिल्यामुळे प्रकल्पाची एकूण सुधारित किंमत रु 12,74,57,084/ इतकी झाली. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक सोडून कामास परवानगी दिली असल्यामुळे रेल्वे परिसरात काम संथगतीने सुरु होते. या कामास दिनांक 5 जून 2011, दिनांक 31 मार्च 2012, दिनांक 30 सष्टेबर 2013,  दिनांक 31 मार्च 2014, दिनांक 31 मार्च 2015, दिनांक 31 डिसेंबर 2015, दिनांक 31 मे 2016 आणि दिनांक 31 डिसेंबर 2016 अशी 8 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतका विलंब झाल्यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही दंडात्मक कार्यवाही केली नाही उलट स्कायवॉकवर मेसर्स जयहिंद रोड बिल्डर्सचे सौजन्याने फलक लावण्यात आले होते. अनिल गलगली यांच्या तक्रारीनंतर पालिकेने कंत्राटदारांच्या नाव सफेद इंकने मिटवण्याची कार्यवाही केली.

No comments:

Post a Comment