Monday 9 January 2017

माजी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी थकविले 44 लाख


महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्या यादीत माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सद्याचे भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावित यांची भर पडली असून गावितांनी तब्बल 44 लाख थकविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री आणि शासकीय अधिका-यांनी शासकीय निवसास्थानापोटी थकविलेल्या रक्कमेची माहिती मागितली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने एकनाथ खडसे यांची माहिती अगोदरच दिली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने अनिल गलगली यांस कळविले की डॉ विजय कुमार गावित यांस मंत्री या नात्याने शासनाने सुरुची सदनिका क्रमांक 3 दिली होती. गावित यांस 20 मार्च 2014 रोजी मंत्री पदास मुकावे लागले पण त्यांनी सदनिका सोडली नाही. नियमाप्रमाणे पहिले 15 दिवस मोफत त्यानंतर शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फुटाचे शुल्क अदा करणे आवश्यक असते. गावित यांनी 2 वर्षे सदनिका सोडलीच नाही. त्यानंतर सदनिका गावित यांनी 29 जुलै 2016 रोजी सोडली आहे. याकाळाचे 44 लाख अदा करणे आवश्यक असतानाही गावित यांनी आजपर्यंत रक्कम अदा केली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने गावित यांस 2 जानेवारी 2017 रोजी नोटीस बजावून 43 लाख 84 हजार 500 इतकी थकबाकीची रक्कम अदा करण्यास सांगितले आहे.

अनिल गलगली यांनी अश्याप्रकारे थकबाकीची रक्कम अदा न करणा-या भाजपाच्या आमदाराचा दरमहा दिला जाणारा पगार रोखण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी अश्याप्रकारे शासकीय थकबाकी अदा न केल्यास जनतेत चुकीचा संदेश जाण्याची भीती गलगली यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment