Friday 20 May 2016

अबब! 26 महिन्यात 159 कोटीचा मोनोरेल घाटा

देशातील पहिली मोनोरेल मुंबईत सुरु करण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयोग महागात पडला असून गेल्या 26 महिन्यात 159 कोटीचे नुकसान झाल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिलेल्या कागदपत्रावरुन समोर येत आहे तर आतापर्यंत रु 220 कोटीची वाढ या मोनोरेल प्रकल्पात झालेली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मोनोरेलच्या प्रकल्पाची विविध माहिती मागितली होती. मोनोरेलचे परिवहन नियोजक शंतनु वाघ आणि परिवहनचे ऑपरेशन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी पी एल कुरियन यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती देत जन माहिती अधिकारी वरुण वैश यांनी अनिल गलगली यांस कळविले टप्पा 1 वडाळा ते चेंबूर मार्गिका दिनांक 2 फेब्रुवारी 2014 रोजी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2014 ते मार्च 2016 या 26 महिन्यात एकूण 1,21,64,831 इतक्या प्रवाश्यांनी प्रवास केला असून तिकीटाच्या विक्रीतून 9,24,95,331 इतके उत्पन्न प्राप्त झाले पण मोनोरेलच्या कार्य आणि देखभाल खर्च 168 कोटी झाला असून उत्पन्नाच्या तुलनेत 158,75,04,669 इतके नुकसान झाले आहे. प्रत्येक महिन्यास रु 6.11 कोटीचे नुकसान एमएमआरडीए सोसत आहे. मोनोरेल प्रकल्पात झालेली दिरंगाई आणि अनियोजनाचा फटका फक्त कार्य आणि देखभालीत झाला असता तर मुंबईकरांचे सुदैव ठरले असते पण एकूण खर्चात आतापर्यंत 220 कोटीची वाढ झाली आहे. हा प्रकल्प रु 2460 कोटीचा होता ज्यात 220 कोटीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीए प्रशासनाने रु 2310/- कोटी ( प्रकल्प खर्च, वाढीव रक्कम आणि कार्य व देखभाल खर्च) अदा करण्याचा उदारपणा दाखविला आहे ज्यात एल एंड टी आणि स्कोमी या प्रमुख कंपन्या कंत्राटदार आहेत. म्हणजे 81 टक्के रक्कम प्रकल्प शतप्रतिशत पूर्ण होण्याआधीच देण्याचा अतिउदारपणा दाखविला आहे. टप्पा 1 आणि टप्पा 2 या कामास लागलेला विलंब पहाता टप्पा 2 केव्हा पर्यंत सुरु होणार याची माहिती अनिल गलगली यांनी विचारली असता त्यांस कळविले की संत गाडगे महाराज चौक ते वडाळा या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर असून जुलै 2016 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.आतापर्यंत 5 वेळा मुदतवाढ दिली गेली असून प्रथम मुदतवाढ ही दिनांक 22 नोव्हेंबर 2012 , दूसरी 31 डिसेंबर 2013, तिसरी 30 जून 2014, चौथी 26 सष्टेंबर 2015 आणि पाचवी 19 ऑगस्ट 2016 अशी आहे. आतापर्यंत झालेल्या 10 दुर्घटनेत 6 मृत्यु आणि 7 जखमी अशी संख्या असून एमएमआरडीएने नुकसानभरपाई देत 34.52 लाख रुपये मृतांच्या कुटुंबियांस दिले आहे तर आता पर्यंत कंत्राटदाराकडून सुरक्षित बाबींवर रु 36.5 लाख इतक्या रक्कमेचा दंड आकारला आहे तसेच रु 50 लाख इतकी रक्कम देयकातून राखून ठेवली आहे. अनिल गलगली यांच्या मते मोनोरेल जगातून हद्दपार होत असताना राजकारणी आणि सनदी अधिका-यांनी निर्जन जागी मोनोरेलचा शुभारंभ करत एकप्रकारे सर्वसामान्य मुंबईकरांची क्रूर चेष्टाच केली आहे. ज्या बिल्डर लॉबीसाठी अश्या जागेची निवड केली त्यात निर्णय घेणा-या सर्वाची चौकशी करत 159 कोटी वसूल करण्याचा नवीन प्रयोग शासनाने केल्यास भविष्यात अश्या घोडचुकीचा प्रयोग कोणीच करणार नाही.

No comments:

Post a Comment