Thursday 3 March 2016

गिरगाव चौपाटी येथील मेक इन इंडियाच्या आगीतील मलबा काढण्यासाठी पालिकेस 8 लाखाचा भुर्दंड

'मेक इन इंडिया' या बैनरखाली गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेली आग मुंबई महानगरपालिकेस महाग पडली असून आगीतील मलबा काढण्यासाठी पालिकेस 8 लाखाचा भुर्दंड बसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेने दिली आहे. पालिकेस आलेला अतिरिक्त खर्च देण्याची केलेल्या मागणीस आयोजक रीजनल डायरेक्टर कॉन्फ़ेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने देण्याची बाब तर दूर राहिली साधे उत्तर सुद्धा दिले नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेस गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीनंतर पालिकेने केलेल्या सफाई कामाची माहिती मागितली होती. डी पालिका विभागातील घन कचरा व्यय खात्याच्या सहायक अभियंता यांनी अनिल गलगली यांस कळविले की गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात 14 फेब्रुवारी 2016 रोजी लागलेल्या आगीनंतर पालिकेने केलेल्या साफसफाई कामांतर्गत 315 मेट्रिक टन इतका डेब्रिज/मलबा उचलण्यात आला असून त्यासाठीचा एकंदर खर्च रक्कम सुमारे 8 लाख 6 हजार 952 रुपये इतका आहे. सदरचे काम डी विभाग तसेच इतर विभागाच्या यंत्र सामग्री, वाहने ,कामगार आणि अशासकीय संस्थेच्या कामगारांमार्फत करण्यात आले. तसेच या कामाकरिता पालिकेस आलेला अतिरिक्त खर्च सदर कार्यक्रमाचे आयोजक रीजनल डायरेक्टर कॉन्फ़ेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांना पालिकेला भरण्याकरिता कळविण्यात आला आहे. परंतु आयोजकांकडून अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात मागणी केली आहे की आयोजक पैसे भरत नसतील पोलिस तक्रार दाखल करावी कारण पालिकेने कठीण समयी खर्च करुन एकप्रकारे आयोजकांस मदत केली आहे. आता मदतीनंतर आयोजकाची अशी वर्तणूक योग्य नव्हे. पालिकेने 10 जेसीबी, 39 डंपरच्या ट्रिप्स, 2 कोम्पक्टोर्स, 198 कामगार आणि 80 सुपरवाइजरी स्टाफ 2 पाळयात डेब्रिज काढण्यासाठी कार्यरत होता. चौपाटी साफसफाईची जबाबदारी आयोजकाची असल्यामुळे पालिकेने केलेला खर्च देण्यास बाध्य आहेत. कॉन्फ़ेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे रीजनल डायरेक्टर कौशलेन्द्र सिन्हा यांस 22 फेब्रुवारी 2016 रोजी पाठविलेल्या पत्रात 7 दिवसात रक्कम भरण्याची वेळ दिली आहे.

No comments:

Post a Comment