Monday 9 November 2015

लंडन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या मालकाचे नाव अजूनही गुलदस्त्यात!

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या घराच्या पाहणीच्या लंडनवारी वर 25.45 लाखाचा पाहणी दौरा खर्च झाला असून मेसर्स सेडॉन या सॉलिसीटर कंपनीस 3.10 कोटी रुपये शुल्क दिले आहे पण या घराच्या मालकाचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी 2 तर प्रधान सचिव उज्वल कुमार उके यांनी 1 वेळा लंडनवारी करत अनुक्रमे 12 आणि 6 दिवस लंडन येथे निवास केला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या भाग भांडवलाच्या रक्कमेतून सर्व खर्च करण्यात येत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या घराचा पाहणी दौरा आणि खर्च झालेली रक्कमेची माहिती मागितली असता प्रथम त्यांस ती खाजगी माहिती असण्याच्या नावावर देण्यास नकार दिला. अनिल गलगली यांनी प्रथम अपील केल्यानंतर उपसचिव दि.रा.डिंगळे यांनी माहिती देण्याचे आदेश जारी केले. अनिल गलगली यांस वेगवेगळया शासन निणयाची कागदपत्रे देण्यात आली. सन 1921-22 या कालावधीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील 10, किंग्ज, हेनरी रोड, एन. डब्लू 3 येथे वास्तव्य होते. सदर वास्तू खुल्या लिलावाद्वारे विक्री करण्याची जाहिरात निवास केलेल्या घराच्या अनुषंगाने मंत्रीमंडळाने दिनांक 03.02.2015 रोजी मान्यता देत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.दिनांक 03.02.2015 रोजी लंडन येथील मेसर्स सेडॉन या सॉलिसीटर कंपनीस 3.10 कोटी रुपये शुल्क देण्यास मान्यता दिली आणि दिनांक 16.02.2015 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेत सदर रक्कम सॉलिसीटर सेडॉन यांच्या खात्यात वळती केली. घर खरेदीच्या पुढील कार्यवाहीसाठी दिनांक 10.04.2015 रोजी शासन निर्णय जारी करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले आणि प्रधान सचिव उज्वल कुमार उके यांच्या लंडन दौ-यासाठी रु 15 लाख मंजूर केली. 12 दिवसानंतर पुनश्च 22.04.2015 रोजी सुधारित शासन निर्णय जारी करत यात रु 5 लाखाची वाढ करत ती रु 20 लाख केली. दिनांक 23.04.2015 ते 28.04.2015 या 6 दिवसासाठी संपूर्ण दौ-यासाठी रु 17,45,641 इतकी रक्कम खर्च झाल्याचा दावा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक यांनी केला आहे. त्यानंतर 4 महिन्यानंतर पुनश्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी एकटयाने विदेश दौरा करत रु 8 लाख खर्च केले. दिनांक 26.08.2015 ते 31.08.2015 या दरम्यान बडोले हे घर खरेदी प्रक्रियेअंतर्गत करार करण्यासाठी लंडनला गेले होते. ज्या साठी शासन निर्णय त्याचदिवशी म्हणजे दिनांक 26.08.2015 रोजी जारी केला गेला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि राज्यमंत्री तसेच गृह राज्यमंत्री सपत्निक लंडन येथे जाण्याची जय्यत तयारी केल्याची चर्चा मंत्रालयात आहे आणि त्याचाही खर्च महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. # घराच्या मालकाचे नाव अजूनही गुलदस्त्यात! भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या घराची किंमत 32 कोटी असून घर मालकाच्या नावाचा कोठेही उल्लेख नाही. या घराची निश्चित केलेली रु 32 कोटीची रक्कम घरमालकाऐवजी सॉलिसीटर मेसर्स सेडॉन याच्याच खात्यात वळती करण्यात आलेली आहे.दिनांक 16.09.2015 रोजी जारी शासन निर्णयानुसार राज्याच्या आकस्मिकता निधीतून रक्कम देण्यात आलेली आहे.या घराच्या मालकाचे नाव अजूनही गुलदस्त्यात असून शासनाने मालकाच्या नावाची माहिती दिली नाही. # दुरुस्ती आणि प्रदर्शनावर 50 लाखाचा खर्च भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर 2015 मध्ये इंग्लड (यूनाइटेड किंगडम) च्या दौ-यावर जात असून या दौ-याच्या वेळी ते राज्य शासनाने खरीदी केलेल्या घरास भेट देणार आहे.तसेच तेथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे दुरुस्तीसाठी आणि प्रदर्शनासाठी रु 50 लाख भारतीय उच्चायुक्त,लंडन यांच्या खात्यात जमा केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची तारीख अजूनही निश्चित नाही.

No comments:

Post a Comment