Sunday 15 November 2015

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख एलएलबी परीक्षेत अनुउत्तीर्ण

मुंबई विद्यापीठाअंतर्गत 740 हुन महाविद्यालये आणि लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या कुलगुरुच्या हातात असते त्यांच्या क्षमतेची चाचपणी करणे हे योग्य नसते पण मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय वसंत देशमुख एलएलबी परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले असल्याची धक्कादायक कबुलीच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 18.09.2015 रोजी मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा निकाल कक्ष, नावनोंदणी विभाग आणि पुनर्मुल्यांकन कक्षाकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय वसंत देशमुख यांनी दिलेली एलएलबी परीक्षा आणि निकालाबाबत माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा निकाल कक्षाचे उपकुलसचिव यांनी अनिल गलगली यांस कळविले की संजय वसंत देशमुख यांनी एलएलबी या पदवी शिक्षणक्रमाच्या सत्र-1 च्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर, 2014 मध्ये घेतलेल्या परिक्षेसाठी अर्ज दाखल केला होता पण ते परिक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत.तसेच ते या शिक्षणक्रमाच्या सत्र-2 च्या एप्रिल/मे, 2015 मध्ये घेतलेल्या परिक्षेस प्रविष्ठ होऊन अनुउत्तीर्ण झालेले आहे. # कायम नावनोंदणी प्रलंबित मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही परिक्षेस विद्यार्थ्यांकडे परिक्षेस बसताना कायम नावनोंदणी क्रमांक असणे आवश्यक असते पण कुलगुरु झालेले डॉ संजय देशमुख यांसकडे अश्या प्रकारचा कायम नावनोंदणी क्रमांक नसल्याची कबूली नावनोंदणी विभागाने अनिल गलगली यांस दिली. मुंबई विद्यापीठाच्या नावनोंदणी विभागाचे उपकुलसचिव यांनी अनिल गलगली यांस कळविले की संजय वसंत देशमुख यांचा कायम नावनोंदणी प्रलंबित असल्याने नावनोंदणी क्रमांक पुरवू शकत नाही. अलिबाग येथील एड दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ मधील विद्यार्थी असलेले संजय वसंत देशमुख यांची पात्रता प्रलंबित असल्यामुळेच त्यांस कायम नावनोंदणी क्रमांक जारी केला नाही. कायम नावनोंदणी क्रमांक जारी होत नाही तोपर्यंत परिक्षेस बसण्यास दिले जात नाही आणि परिक्षेस बसला तर अश्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जात नसल्याचे सांगत अनिल गलगली यांनी आरोप केला की कुलगुरु असल्यामुळेच नियम बाजुला सारत निकाल जाहीर केला गेला आहे. # पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला नाही एलएलबी या शिक्षणक्रमाच्या सत्र-2 च्या एप्रिल/मे, 2015 मध्ये घेतलेल्या परिक्षेस प्रविष्ठ होऊन अनुउत्तीर्ण झाल्यानंतर संजय वसंत देशमुख यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला नसल्याची माहिती अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मुल्यांकन कक्षाच्या उपकुलसचिव यांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुख एलएलबी परीक्षेत अनुउत्तीर्ण झाल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत सर्च कमिटीने कोणत्या आधारावर आणि गुणवत्तेवर देशमुखाची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर वर्णी लावली आहे? असा सवाल करत अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलपति असलेल्या राज्याचे राज्यपाल यांस पत्र पाठवित मुंबई विद्यापीठाची इभ्रत वाचविण्याचे साकडे घातले आहे. अनुउत्तीर्ण झालेल्या डॉ संजय देशमुख यांच्यामुळे मुंबई विद्यापीठाची उज्वल परंपरा आणि प्रतिमेस धक्का बसल्याचे मत अनिल गलगली यांनी सरतेशेवटी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment