Wednesday 8 July 2015

पालिका आणि वाहतुक पोलिसांच्या चुकीचा फटका बेस्ट सेवेला

एमएमआरडीए प्रशासनाचे अनियोजनावर पांघरुण घालण्यासाठी पालिका आणि वाहतुक पोलिसांनी सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गावरुन कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण बंद करण्याची चूक आता बेस्ट प्रशासनाला भोगावी लागत आहे. पालिका आणि वाहतुक पोलिसांच्या चुकीचा फटका बेस्ट सेवेवर झाला असून दररोज 1.79 लाखांचा अतिरिक्त खर्च होत असल्याची धक्कादायक कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली असून 4 रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाला सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गावरुन कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण बंद केल्यामुळे होणारे नुकसान बाबत माहिती विचारली होती. बेस्टचे सहाय्यक आगार व्यवस्थापक अभय शेलार यांनी अनिल गलगली यांस कळविले की सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गावरुन कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण बंद केल्यामुळे एकूण 18 बसमार्गावर परिणाम झालेला असून दररोज सरासरी 1411 बसफे-या येथून प्रवतित करण्यात येतात. प्रति बसफेरी 1.3 किलोमीटर अंतर वाढलेले असून एकूण 1834.3 ( 1411×1.3 ) किलोमीटर अंतराचा प्रवास वाढलेला आहे. उपक्रमाच्या  बसगाडयांच्या प्रति किलोमीटर प्रवतन खर्च रु 97.72 असा आहे. जो अतिरिक्त 1834.3 किलोमीटर करिता रु 1,79,248  हा अतिरिक्त खर्च दररोज करावा लागत आहे. कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण बंद केल्यामुळे बसमार्ग क्रमांक 37, 192, 183, 309, 310, 313 जादा 318, 320, 325, 326,  330, 332, 349, 365, 446 या 15 बसमार्गाच्या प्रवासमार्गावर एकूण 121 ठिकाणी प्रत्येकी रु 4 भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाकडे सादर करण्यात आलेला असल्याची माहिती गलगली यांस देत बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले की पालिका, वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीए यापैकी कोणत्याही आस्थापनाने बेस्ट प्रशासनाबरोबर कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही ना मत तसेच 'ना हरकत प्रमाणपत्र' याची मागणी केली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनास याबाबत माहिती मागताच एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की एमएमआरडीएने सदर रस्ता दिनांक 2 मे 2015 रोजी पालिकेस हस्तांतरित केला असल्यामुळे पालिकेशी संपर्क साधावा. एमएमआरडीएने वाहतूक पोलिसांच्या दिनांक 16 मे 2015 रोजीच्या पत्राची प्रत गलगली यांस दिली आहे ज्यात वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या आदेशावर दिनांक 6 मे 2015 रोजी कव्हस्टोन लावुन उजवे वळण बंद केल्याचा दावा केला आहे. कुर्ला एल विभागाने वाहतूक अधिकारी प्रतापराव दिघावकर आणि अतिरिक्त पालिका अधिकारी पूर्व उपनगरे यांच्या आदेशाने उजवे वळण हे दुभाजक लावून बंद करण्याची माहिती देत पुढे दावा केला की  याबाबत वाहतूक जलद होण्यासाठीचा उपाययोजना म्हणून सदरचे दुभाजक बंद करणे आवश्यक असल्याचे वाहतूक खात्याचे म्हणणे होते. कुर्ला पोलिसांनी दिनांक 15 जून 2015 रोजी पालिका, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांना पाठविलेल्या अहवालात हनुमान मंदिर येथील स्पीड ब्रेकर काढल्यामुळे 11 जून रोजी एक महिला रस्ता ओलांडत असताना  अज्ञात मोटर वाहनाने ठोकर मारल्याने तिचा मृत्यु झाला असून उजवे वळण खुले करण्याचा पर्याय सुचविला आहे. अनिल गलगली यांनी सदर प्रकार म्हणजे अंगावर ओढावुन घेतलेला चुकीचा निर्णय असल्याचे सांगत यामुळे गरीब महिलेस प्राण गमवावे लागल्याची खंत व्यक्त केली. नियोजन चुकल्याची स्पष्टोक्ती देण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजविणा-या आयएएस अधिकारी श्रीनिवास आणि संबंधित वाहतूक पोलिसांकडून दरमहा होणारा अतिरिक्त खर्च वसूल करावा किंवा दोन्ही खात्याने तो अदा करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पोलिस आयुक्त राकेश मारिया यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. विशेष म्हणजे नोटिफिकेशन न काढताच अनधिकृतपणे उजवे वळण बंद करण्याचे धाडस दाखविणारी पालिका आणि वाहतूक पोलीस सीएसटी आणि एसजी बर्वे मार्गावरील अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण काढण्यासाठी कधीच धाडस दाखवित नाही.

No comments:

Post a Comment